लोकसभा क्षेत्र निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

0
142

* 16 लाखांवर मतदार बजावणार मतदानाचा हक्क
* 20 मार्चपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात 27 मार्च पर्यंत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज, शनिवारी जाहीर केला असून याअंतर्गत आचार संहिताही लागू केली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भाअंतर्गत येत असलेल्या पाच लोकसभा क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. याअंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. 20 ते 27 मार्चंपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. गडचिरोली लोकसभा क्षेत्रात 16 लाख 13 हजार 96 हजार मतदार मतदान प्रकियेत सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात 16 लाखांवर मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. यात 8 लाख 205 पुरुष, 7 लाख 99 हजार 402 स्त्रिया तर 12 तृतीयपंथी तर 1470 सेनादलातील मतदारांचा समावेश आहे. एकूण 1886 मतदार केंद्रावर मतदानाचा प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शी, शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

15 हजार कर्मचा-यांसह 20 हजारांचा फौजफाटा
मतदानाची प्रक्रिया 1886 मतदार केंद्रावर पार पाडली जाणार आहे. याकरिता केंद्रावर 15 हजारांहून अधिक निवडणूक अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत. तर पोलिस अधिकारी, जवान, सीआरपीएफ, एसआरपीएफ व इतर सुरक्षा दलाचे तब्बल 20 हजार जवानांचा फौजफाटा निवडणूक प्रक्रियेत कार्यरत राहणार आहे.

तीन विधानसभा निहाय मतदार
विधानसभा केंद्र पुरुष स्त्री
आरमोरी 302 1,29,789 1,28,691
गडचिरोली 354 1,52,248 1,48,688
अहेरी 292 1,23,668 1,21,058

नियम मोडण्याचे प्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी पैसे वाटल्याच्या किंवा प्रचाराचे नियम मोडल्याच्या अनेक घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहेत. याकरिता मतदारांना ‘सीव्हीजिल’ अ‍ॅपबाबत माहिती दिली जाणार असून एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाचा उमेदवार पैसे किंवा वस्तू वाटत असेल किंवा निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर कोणताही नागरिक या ॲपवर तक्रार करु शकतो.

100 मिनीटात होणार तक्रारींचे निवारण
तक्रारदारांनी पैसे वाटप होत असल्याचा किंवा वेळेनंतर प्रचार होत असेल तर केवळ त्याचा एक फोटो काढायचा आहे. हा फोटो सीव्हिजिल ॲपवर अपलोड करावयाचा आहे. ते शक्य नसेल तर एक मेसेजही सीव्हिजिल अ‍ॅपवर पाठवता येईल. तक्रार कर्त्याचा मोबाईल लोकेशनचा वापर करुन अक्षांश-रेखांशावरुन तक्रारकर्त्यांचा ठावठिकाणा शोधला जाईल. त्यानंतर 100 मिनिटांत निवडणूक आयोगाचे पथक त्याठिकाणी पोहोचेल आणि तक्रारीचे निवारण करणार आहे.

निवडणूका शांततेत पार पाडणार
लोकसभा निवडणूक निष्पक्ष आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पडावी, यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. गडचिरोली-चिमुर या लोकसभा क्षेत्रातील निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
संजय दैने, जिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here