– विद्यापीठ प्रशासानात खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यपीठामध्ये विद्यापीठ अंतर्गत रकमेचा अपहार व आर्थीक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन निम्न श्रेणी लिपीक व एका महिला उच्च श्रेणी लिपीकासह वाहनचालकावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील महिला आरोपी वगळता तिघांना अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयात हजर केले असता १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेने विद्यापीठ प्रशासन खळबळून जागे झाले असुन एवढा मोठा अपहार उघडकीस आल्याने विद्यापीठ प्रशासनात खळबळ ही उडाली आहे. महेशकुमार उसेंडी निम्न श्रेेणी लिपीक, कुमारी प्रिया पगाडे उच्च श्रेणी लिपीक, अमोल रंगारी निम्न श्रेणी लिपीक व अमीतकुमार जांभुळे वाहन चालक असे या प्रकरणातील आरोंपींची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर पठारे हे गोंडवाना विद्यापीठामध्ये वित व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान २०२३-२०२४ या वर्षाकरीता विद्यापीठाचे अंकेक्षण करण्यासाठी मे २०२४ मध्ये आर्थिक व्यवहारा संदर्भातील कार्यालयीन अभिलेखाचा आढावा घेवून संबंधित अभिलेख अदयावत करून ठेवणे संबधात संबधित लिपीकांना आदेशित करण्यात आले होते. त्या दरम्यान विद्यापीठा अंतर्गत प्राध्यापक व इतर मान्यवर तसेच कर्मचारी यांचे प्रवास भत्ता, मानधन इत्यादी मान्यतेनुसार धनादेश एनईएफटी ( NEFT) व्दारे शोधन करून संबंधितांना रक्कम अदा करणे इत्यादी शासकीय कामा करीता निम्न श्रेणी लिपी लिपीक महेशकुमार उसेंडी यांच्या कडे कार्यभार सोपविण्यात आलेला होता. त्या संबंधातील अभिलेखाची पडताळणी केली असता त्यांचे कडील अभिलेखा मधील नोंदी मध्ये विसंगती आढळून आल्याने त्यांना पत्र देवून अभिलेख अदयावत करून पडताळणी करीता सादर करण्यास आदेशित केले. परंतु महेशकुमार उसेंडी यांनी सदरचे अभिलेख पडताळणी करीता सादर करण्यास अधिकचा वेळ मागितला त्यामुळे त्यांचे कडील अभिलेखामधील नोंदीची सखोल चौकशी केली असता टी.एम नेटवर्क सॉफटवेअर मधुन काढलेल्या धनादेशाची यादी व अभिलेखामध्ये सुध्दा तफावत आढळून आली. त्यांचे दैनदिन कर्तव्यात संशय बळावल्याने २०२२-२०२३ तसेच २०२३-२०२४ या आर्थीक वर्षामधील वित्त व लेखा अधिकारी यांचे नावाने बॅंक ऑफ इंडिया गोंडवाना विद्यापीठ शाखा गडचिरोली येथील विद्यापीठाचे साधारण निधी खात्यामधून ठरावीक ११ बॅंक खात्यावर वारंवार रकमा वळती केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने त्या संदर्भात कुलगुरू यांना माहिती दिली असता त्यानी सदर गैरप्रकारासंदर्भात सखोल चौकशी करण्यात मौखीक आदेशित केले. तसेच त्यांनंतर सदरचे बॅंक खात्यावरील रकमा ज्यांचे नावाने ट्रान्सफर केले होते त्यासंबधात स्वत : बॅंकेच्या माध्यमातून पडताळणी केली असता संबंधित बॅंक कडून हस्तगत करण्यात आलेल्या स्टेटमेंटचे अवलोकन नुसार १९ मे २०२२ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यानच्या कालावधीत महेशकुमार उसेंडी यांनी स्वतः चे तसेच कुमारी प्रिया पगाडे, उच्च श्रेणी लिपीक, अमोल रंगारी निम्न श्रेणी लिपीक, अमीतकुमार जांभुळे वाहन चालक यांचे बॅंक खात्यावर एकुण १ कोटी ४६ लाख ५८ हजार ३१६ रूपये वळती केल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकार उघडकीस आल्याने, महेशकुमार उसेंडी, कुमारी प्रिया पगाडे, अमोल रंगारी, अमीतकुमार जांभुळे यांच्याविरोधात पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार दाखल केली असता ४२०, ४०९, १२० B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील तिघांना अटक करण्यात आली व महिला आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही अशी माहिती आहे. आरोपीना न्यायालयात हजार केले असता १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात राजकुमार मडावी करीत आहे.














