पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली पोलीस नक्षल चकमक ; नक्षली ठार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २१ : २१ ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्हयाच्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी – कोठी जंगल परिसरात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत काही नक्षली ठार झाल्याची माहिती सुत्रांव्दारे प्राप्त झाली आहे. मात्र अद्याप ठार झालेल्या नक्षल्यांचा आकडा निश्चित कळू शकला नाही. तर या चकमकीत एक पोलीस जवानही जखमी झाल्याचेही कळते.
भामरागडा तालुक्यातील कोपर्शी कोपर्शी – कोठी जंगल परिसरात काही नक्षली असल्याची गुप्त माहिती पोलीस दलास मिळाली असता पोलीसांनी नक्षलविरोधी अभियाना राबविले. दरम्यान पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली यात काही नक्षली ठार झाले तर एक पोलीस जवानही जखमी झाल्याचे कळते.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने निवडणुकांच्या तयारीसाठी लोकप्रतिनिधी आपल्या क्षेत्रात दौरे करतांना दिसून येत आहे. चकीमक उडाली ते क्षेत्र अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असून अहेरी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतात. या दरम्यान चकमक उडाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ऐन विधानसभा निवडणूकादरम्यान नक्षली सक्रीय होवून पून्हा डोके वर काढतांना दिसून येत आहे.
अदयाप चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचा निश्चित आकडा व नाव कळू शकले नाही. दोन दिवसांपूर्वीच नक्षली दाम्पत्याने गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

