शासकीय सेवेत निवडलेल्या युवकांचा शिवराय सामाजिक संस्थेतर्फे सत्कार
लोकवृत्त न्यूज
नवेगाव : येथील शिवराय सामाजिक संस्था, नवेगाव मुरखडा यांच्या वतीने १० एप्रिल २०२५ रोजी शासकीय सेवेत यश मिळवलेल्या युवकांचा गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले गणेश किशोर गडपल्लीवार, आरोग्य सेवकपदी निवड झालेले राहुल गंगाधर गेडाम, आणि स्थापत्य अभियंता झालेल्या पराग हिराचंद नेवारे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सत्कारमूर्तींसोबत त्यांच्या पालकांचीही उपस्थिती लाभली होती. या प्रसंगी राहुल गेडाम व पराग नेवारे यांनी आपापल्या प्रवासातील अडथळ्यांवर मात करत मिळवलेल्या यशाची प्रेरणादायी कहाणी सांगून उपस्थितांना उर्जा दिली.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मेहनतीने यश मिळवलेल्या युवकांचा सन्मान करत इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणे हा होता. भविष्यातही हे युवक आपल्या कार्यातून समाजहितासाठी योगदान देतील, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवराय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परमानंद राजू पुन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सूत्रसंचालन स्वतः अध्यक्षांनी तर प्रस्तावना मयूर मुनघाटे यांनी केली. यावेळी संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
हा समारंभ गावातील युवकांसाठी आदर्शवत ठरला असून, सामाजिक संस्थांच्या अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला दिशा आणि प्रेरणा मिळत आहे.

