कार्यगटाची पहिली बैठक सर्च, शोधग्राम येथे संपन्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १२ एप्रिल :- गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या १४ सदस्यीय कार्यगटाची पहिली बैठक काल सर्च फाउंडेशन, शोधग्राम येथे संपन्न झाली. या बैठकीत येत्या तीन वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अभय बंग होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, डॉ. आनंद बंग, डॉ. बबिता कमलापूरकर, डॉ. प्रताप शिंदे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. अमोल पाटील, डॉ. पंकज हेमके, डॉ. सुप्रियालक्ष्मी तोटीगर, डॉ. मनीष धकाते आदी मान्यवर आणि कार्यगट सदस्य उपस्थित होते.
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्यस्तरीय तज्ज्ञांनीही सहभाग नोंदवला. यामध्ये एफडीईसीचे डॉ. अल्ताफ लाल, डॉ. मदन प्रधान, डॉ. दावल साळवे, एनआयएमआरचे डॉ. हिम्मत सिंह आणि एनव्हीबीडीसीचे माजी संचालक डॉ. निरज धिंग्रा यांचा समावेश होता.
या बैठकीत मलेरिया निर्मूलनासाठी प्रभावी रणनीती, स्थानिक पातळीवरील सहकार्य आणि संसाधनांचा योग्य वापर यावर भर देण्यात आला. उपस्थित सदस्यांनी आराखड्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, उपाययोजना आणि धोरणात्मक दृष्टिकोन याबाबत सखोल चर्चा केली.
या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकण्यात आले आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा व तज्ज्ञांच्या समन्वयातून या मोहिमेला यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीतून व्यक्त झाला.

