चिमूर हादरलं! दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार, संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याला घातला वेढा
– टायर पेटवून तीव्र निषेध
लोकवृत्त न्यूज
चिमूर :- चिमूर शहरातील वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर त्याच वॉर्डातील नराधमांनी खाऊच्या आमिषाने घरात बोलावून सप्टेंबरपासून वेळोवेळी अत्याचार केल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणात रशीद रुस्तम शेख (नडेवाला) आणि नसीर वजीर शेख (गोलेवाला) या दोन नराधमांना चिमूर पोलिसांनी अटक केली असून, शहरात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे.
पीडित मुली दररोजच्या उपजीविकेसाठी धडपडणाऱ्या कुटुंबांतील असून, दोघीही शेजारी-शेजारी राहतात आणि मैत्रिणी आहेत. नराधमांनी त्याच ओळखीचा फायदा घेत आधी एकाने – तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याने – खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केला. या दोघांनी अल्पवयीन मुलींवर सप्टेंबरपासून अनेक वेळा अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्रीच दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्याचा वेढा घालत “अत्याचाऱ्यांना फाशी द्या” अशा घोषणा दिल्या. टायर पेटवून निषेध करण्यात आला, दगडफेकीची घटना घडली, तर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला.
पोलीस ठाण्याबाहेर जमलेला संतप्त जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी जादा कुमक मागवली. काही वेळाने जमावाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेकीचा प्रकार घडल्याने तणाव अधिक वाढला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्यासह पोलीस दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शहरात तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Chandrapurnews @Chandrapurpolice #crime)

