गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ; ९.२४ लाखांची सुगंधित तंबाखूसह इनोव्हा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

395

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ; ९.२४ लाखांची सुगंधित तंबाखूसह इनोव्हा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२३ एप्रिल :- राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ९ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशावरून आणि जिल्ह्यातील अवैध तंबाखू, दारू व जुगार व्यवसायांवर नकेल कसण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत, 22 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली, की अर्जुनी–देसाईगंज मार्गे एका इनोव्हा वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा वितरित केला जाणार आहे.
पथकाने अर्जुनी–देसाईगंज मार्गावर सापळा रचून टोयोटा इनोव्हा (क्र. MH-15-BN-5689) थांबवली. वाहन तपासणीअंती ५,४४,३०४/- रुपये किमतीची सुगंधित तंबाखू आढळली. वाहनचालक अस्पाक मुन्ना शेख (वय २५, रा. गोंदिया) याने तंबाखूचा मालक रवी मोहनलाल खटवानी (रा. गोंदिया) असल्याची कबुली दिली. यानंतर इनोव्हा वाहन (किंमत ३,८०,०००/- रुपये)सह एकूण ९,२४,३०४/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली यांच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध IPC 2023 च्या विविध कलमांखाली तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांनी केले असून, तपास सपोनि. संदीप आगरकर करीत आहेत. या कारवाईत मपोउपनि. सरीता मरकाम, पोहवा दिपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, पोअं सचिन घुबडे, निशीकांत अलोणे आणि निकेश कोडापे यांचा सहभाग होता.
गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध तंबाखू विक्रेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice @gadachirolipolice #crime )