उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

584

कुरूड गावासमोरील वळणावर भीषण अपघात

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि.११ मे :- गडचिरोली–चामोर्शी महामार्गावरील कुरूड गावाजवळील वळणावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये प्रतीक निळकंठ निमसरकार (वय २६, रा. आष्टी) आणि सचिन विनायक रोहनकर (वय २६, रा. गणेशनगर, चामोर्शी) यांचा समावेश आहे. अपघात ११ मे रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घडला.
एमएच ३३ झेड २०४८ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीहून चामोर्शीकडे येत असताना, कुरूड गावाजवळील बसस्थानकाच्या पुढे रस्त्याच्या वळणावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही तरुण जागीच ठार झाले.
सदर ट्रॅक्टर स्वप्नील गुडलावर यांच्या मालकीची असून ती रोड बांधकामासाठी वापरात होती. अपघातानंतर मृतदेह ग्रामिण रुग्णालय, चामोर्शी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमूल कादबाने आणि भास्कर मानाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, ट्रॅक्टर रस्त्यावर उभा का होता, याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #accident )