रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला तातडीची मदत; सहपालकमंत्री जयस्वाल यांची रुग्णालयात भेट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १५ : आरमोरी तालुक्यातील मानापूर (देलनवाडी) येथील रहिवासी इंदिराबाई सहारे यांच्यावर रानटी हत्तीने हल्ला करून गंभीर जखमी केले. सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात भेट देत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि वनविभागातर्फे ५० हजार रुपयांचा तातडीचा मदतनिधी धनादेश स्वरूपात प्रदान केला.
इंदिराबाई सहारे यांच्या उपचारात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी त्यांनी आरोग्य व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पीडितांना तत्काळ मदत दिली जावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहपालकमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadchirolipolice #crimenews #forestdepartment)










