Home Breaking News गडचिरोलीत मोठी कारवाई : अवैध देशी दारूसाठा व चारचाकी वाहनासह 20.70 लाखांचा...

गडचिरोलीत मोठी कारवाई : अवैध देशी दारूसाठा व चारचाकी वाहनासह 20.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

1075

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२ :- जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण 20.70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. झिंगानूर येथे ही कारवाई पार पडली असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर तिघे फरार आहेत.
21 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे झिंगानूर येथील कारे कोरके गावडे (वय 38) यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. झडतीदरम्यान घरात रॉकेट ब्रँड देशी दारूच्या 124 बॉक्समध्ये एकूण 12,400 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या दारूची अंदाजे किंमत 12.40 लाख रुपये आहे.
पोलिसी चौकशीत गावडे याने दारू समया बापू दुर्गम आणि सडवली बापू दुर्गम यांच्या मालकीची असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकला असता, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, त्यांच्या अंगणात उभ्या असलेल्या बोलेरो (क्र. AP-15-M-1088) या वाहनातून 4,800 बाटल्या (48 बॉक्स) देशी दारू व 3.50 लाखांचे वाहन असा एकूण 8.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संपूर्ण कारवाईत एकूण 20.70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गावडे याला अटक करण्यात आली असून, उर्वरित तिघा फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी झिंगानूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #naxal )

Don`t copy text!