सुरजागड लोहखनिज वाहतुकीचा आणखी एक बळी : गडचिरोलीच्या मुख्य चौकात भीषण अपघात, युवक ठार

1089

– रविवारी दोन अपघातांनी शहर हादरले; नागरिक संतप्त, पोलिस यंत्रणा अडचणीत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ :– सुरजागड येथून सुरू असलेल्या लोहखनिज वाहतुकीने पुन्हा एकदा गडचिरोलीकरांचा जीव घेतला. आज रविवार, २५ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती इंदिरा गांधी चौकात भीषण अपघात घडला. MH 34 BG 7135 क्रमांकाच्या लोहखनिज वाहून नेणाऱ्या ट्रकने एका युवकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, शहरात संतापाची लाट उसळली आहे.
अपघातानंतर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया देत मृतदेह हटवण्यास नकार दिला. “सुरजागडच्या खनिज प्रकल्पातील जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही,” असा पवित्रा घेत नागरिकांनी चौकातच ठिय्या मांडला. पाहता पाहता मोठी गर्दी जमली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने मोठा फौजफाटा दाखल करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने “जाऊ द्या, जाऊ द्या” असे बोलत संतप्त नागरिकांच्या भावना चिघळवल्या. त्यामुळे काही वेळातच दोन स्थानिक प्रतिनिधींमध्ये वाद निर्माण झाला आणि परिस्थिती आणखी बिघडली. संतप्त नागरिक ट्रक पेटवण्याची भाषा करत असल्याचेही निदर्शनास आले.
या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर अखेर सी-६० जवान आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने गर्दी पांगवण्यात आली आणि ट्रक पोलिस ठाण्यात हलवण्यात आला. अपघातानंतर चारही मार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती. लोहखनिज वाहतुकीच्या ट्रकच्या लांबच लांब रांगा शहराच्या मुख्य रस्त्यावर पाहावयास मिळाल्या.
दुर्दैव म्हणजे, अवघ्या १२ तासांत याच चौकात दुसरा अपघात घडला. दुपारच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका नागरिकाला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे आजचा रविवार हा अपघातांचा काळा दिवस ठरला.
दरम्यान, अपघातानंतर नागरिकांमध्ये असा ठाम विश्वास व्यक्त होत होता की, सुरजागडच्या लोहखनिज वाहतुकीस पोलिसांकडून संरक्षण मिळत आहे. “अपघात होत असतानाही कोणतीही कारवाई होत नाही, यामागे पोलिस यंत्रणांचे संरक्षण आहे,” असा संशय नागरिक व्यक्त करत होते.
सुरजागडमधून होणारी ही अव्यवस्थित आणि जीवघेणी वाहतूक स्थानिकांसाठी मृत्यूच्या सावल्या घेऊन येत आहे. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना न केल्यास नागरिकांचा संयम सुटल्यास काय होईल याची झलक आजच्या संतप्त प्रतिक्रिया आणि तणावात दिसून आली. मृत युवकाचे नाव बातमी लिहेपर्यंत समजू शकले नाही.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #surjagarh #accident )