मराठी भाषेवर गदा नको! – गडचिरोलीत मनसेचा इशारा

198

– तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न सुरु असून, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे मनसेने स्पष्ट इशारा दिला की, जर गडचिरोलीतील शाळांमध्ये पहिलीपासूनच तिसऱ्या भाषा म्हणून हिंदी लादली गेली, तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल.
“महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून लहानग्यांवर इतर भाषांची सक्ती होऊ नये,” असे मत व्यक्त करत मनसेने केंद्र सरकारच्या धोरणावरही टीका केली. गुजरात, कर्नाटक, केरळसारख्या इतर राज्यांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नसताना, महाराष्ट्रातच का हा अट्टहास? असा सवाल उपस्थित करत, राज्यावर थोपवलेल्या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये निवेदने देण्यात येत आहेत. गडचिरोलीतील निवेदनप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र गडपल्लीवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर अंकुश संतोषवार, शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार, उपशहराध्यक्ष आशिष खडसे, सचिव आकाश कुळमेथे तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेने घेतलेला हा आक्रमक पवित्रा आता पुढील काही दिवसात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @मनसे #RajThackeray #नगरपरिषद गडचिरोली )