लाचेच्या पैशात बुडाले नेतृत्व : अमिर्झाच्या सरपंच व सदस्य अपात्रतेचा दणका
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ता. २७ जून :– विकासकामाच्या नावाखाली लाचखोरीचा घोटाळा उघडकीस येताच अमिर्झा ग्रामपंचायतीतील नेतृत्वाला जोरदार धक्का बसला आहे. नालीतील गाळ उपशाचे बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या सरपंच सोनाली गोकुलदास नागापुरे आणि सदस्य अजय भास्कर नागापुरे यांना विभागीय आयुक्त कार्यालयाने अपात्र ठरवले आहे.
सन २०२२-२३ मध्ये अमिर्झा ग्रामपंचायतीच्या नालीतील गाळ काढण्याचे काम १.७७ लाख रुपयांना मंजूर झाले होते. यापैकी १.३२ लाख रुपये कंत्राटदार प्रेमचंद परशुराम धाकडे (रा. धुंडेशिवणी) यांना अदा करण्यात आले. उर्वरित ४५ हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी सरपंच आणि सदस्याने मिळून पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर चार हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अमिर्झा टोली येथे रंगेहाथ पकडले आणि गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाची सुनावणी ७ एप्रिल २०२५ रोजी विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात झाली. त्यानंतर १० जून रोजी विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी सरपंच व सदस्य अपात्र असल्याचा निर्णय दिला. हा आदेश १९ जून रोजी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला पाठवून अंमलबजावणी केली.
ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेला जबर धक्का देणाऱ्या या प्रकरणामुळे गावकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून, स्थानिक स्वराज्य संस्थांतील भ्रष्टाचाराविरुद्धची ही निर्णायक कारवाई मानली जात आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @gadachiroli police #ग्रामपंचायत )

