– २०१९ पासून सुरू असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १६ जुलै : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१९ पासून सुरू असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश झाला असून, औषधी निर्माण अधिकारी महेश प्रभाकर देशमुख यांना आज उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
महेश देशमुख यांच्यावर गेल्या काही वर्षांत औषध खरेदी प्रक्रियेत मोठ्या आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले होते. संबंधित तक्रारी पालकमंत्री व सहपालकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत करण्याचे आदेश दिले.
चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात गंभीर आर्थिक अपहाराची शक्यता नमूद केली. त्यानंतर सहसंचालक, अर्थ व भांडार, आरोग्य सेवा, मुंबई यांनी स्वतंत्र तपास करत गंभीर अनियमितता आढळून आल्याचा निष्कर्ष काढला.
यावरून नियुक्त प्राधिकाऱ्यांनी निलंबनाची तात्काळ शिफारस करताच, उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांनी देशमुख यांना निलंबित करून त्यांचे नवीन मुख्यालय रजेगाव, जि. गोंदिया येथे निश्चित केले आहे.
या घोटाळ्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेतील भ्रष्टाचारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्यासोबत संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही
( #LOKVRUTTNEWS #lokvrutt.com @lokvruttnews #gadachirolinews #Maharashtra #medical #Mahesh Prabhakar Deshmukh #crime #dismis)

