घुग्घुसमध्ये गावठी कट्टा व जिवंत काडतुससह दोघे अटकेत

123

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर दि. २६ :- घुग्घुस हद्दीत अवैधरित्या बाळगलेले गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुस जप्त करत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. ही धडक कारवाई २६ जुलै रोजी शास्त्रीनगर परिसरात करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय सूत्रांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, शास्त्रीनगर वार्ड क्र. ५, घुग्घुस येथील सोनुलाल उर्फ नन्नू कैथल (वय २८) याच्या घरावर पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान आरोपीच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा एकूण २५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपी सोनुलालने सदर अग्निशस्त्र गांधीनगर, घुग्घुस येथील त्याचा मित्र मासिन निसार शेख (वय २८) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी मासिन निसारलाही ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, दीपक डोंगरे, इमरान खान, पोअ. किशोर वाकाटे व हिरालाल गुप्ता यांनी संयुक्तपणे केली.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #chandrapurnews #Maharashtra #crime #naxal #chandrapur_police @spchandrapur #घुग्घुस #स्थानिक गुन्हे शाखा )