आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (ता. एटापल्ली) दि.28 :- उप पोलिस स्टेशन कसनसूर अंतर्गत येत असलेल्या हालेवारा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विकेश सोमजी किरंगा (वय २४ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कोठी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) या युवकाने १६ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधामुळे पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीचे जबाब घेण्यात आले. तिच्या जबाबांवरून संबंधित आरोपीला तिच्या वयाची पूर्ण जाणीव असूनदेखील त्याने तिच्याशी जवळीक साधली व ती अल्पवयीन असूनही लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असे स्पष्ट झाले आहे. यामुळे संबंधित युवकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस मदत केंद्र कसनसूर येथे करण्यात आली आहे. मात्र, गुन्ह्याचे घटनास्थळ हालेवारा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी मूळ कागदपत्रे पो.ह. दिवाकर होळी, पोमके हालेवारा यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
या प्रकरणी आरोपी विकेश सोमजी किरंगा याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 64, 64(2) (i) (m), 137(2) सह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) 2012 अंतर्गत कलम 4, 6, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal )












