शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचना ; नियम तोडल्यास शिस्तभंगाची कारवाई
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि. २८ जुलै २०२५ :- डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी संवादमाध्यम असले तरी त्याचा वापर करताना शासकीय कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने व नियमांच्या चौकटीत राहून वागावे, यासाठी राज्य शासनाने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केला असून, हे नियम राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, मंडळे तसेच करार पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील.
नवीन नियमांनुसार, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट वेगवेगळे ठेवावेत. शासकीय पदनाम, लोगो, गणवेश किंवा शासकीय मालमत्तेचे फोटो वैयक्तिक अकाऊंटवर पोस्ट करू नयेत. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, भेदभाव करणाऱ्या किंवा गोपनीय माहितीचा प्रसार करणारा मजकूर पोस्ट वा फॉरवर्ड करणे सक्त मनाई आहे.
शासनाच्या अथवा भारत सरकारच्या धोरणावर जाणीवपूर्वक प्रतिकूल टीका करू नये. शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीविषयी माहिती सोशल मीडियावर पोस्ट करता येईल, मात्र त्यातून स्वप्रशंसेस प्रोत्साहन देता कामा नये. कार्यालयीन कामकाजासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल, मात्र कोणतीही गोपनीय कागदपत्रे सोशल मीडियावर अपलोड करण्यास प्राधिकृत मंजुरी आवश्यक असेल.
या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ नुसार केली जाईल. तर उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे.
राज्य सरकारच्या या पावलामुळे शासकीय यंत्रणेची विश्वासार्हता, गुप्तता आणि शिस्त अबाधित राखली जाणार असून, सोशल मीडियाच्या वापरास अधिक शिस्तबद्ध आणि जबाबदारीने हाताळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
#शासननिर्णय #सोशलमीडिया_नियम #शासकीयकर्मचारी #सामान्यप्रशासनविभाग #महाराष्ट्रशासन #डिजिटलशिस्त #शिस्तभंग #सरकारीसेवा #गोपनीयता #मर्यादितस्वातंत्र्य #SocialMediaPolicy #GovernmentEmployees #MaharashtraGovernment #OfficialGuidelines #DigitalDiscipline #lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal










