९ ऑगस्टला नागपुरात ‘महाराष्ट्रवादी और विदर्भविरोधी चले जाओ’ आंदोलन – विदर्भ हक्कासाठी निर्णायक हाक

199

– स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा एल्गार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ६ :
“विदर्भाचे स्वतंत्र राज्य तातडीने स्थापन झाले पाहिजे” या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ९ ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. संविधान चौकात दुपारी १२ ते ४ या वेळेत “महाराष्ट्रवादी और विदर्भविरोधी चले जाओ” या घोषवाक्याखाली हे निदर्शने आंदोलन होणार असून, याची माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी गडचिरोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना अॅड. चटप म्हणाले की, भारतीय संविधानाच्या कलम ३ नुसार केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याची तातडीने घोषणा करावी. गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक पातळीवर विदर्भाची सुरू असलेली पिळवणूक थांबवणे अत्यावश्यक झाले आहे. महाराष्ट्र सरकारकडून सातत्याने विदर्भाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्राचे महसुली उत्पन्न सुमारे ५.६० लाख कोटी रुपये असतानाही, ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यावर ७.८२ लाख कोटींचे कर्ज आहे. त्यावरील व्याजाचा बोजा ५६,७२७ कोटी रुपये, तसेच नव्याने १३ हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. पुढील आर्थिक गरजांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे १.३२ लाख कोटी रुपयांच्या कर्जासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्याचे एकूण कर्ज ९.८३ लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.

या गंभीर आर्थिक परिस्थितीत राज्य सरकारला विदर्भाच्या ६० हजार कोटींच्या सिंचन अनुशेषासह, आरोग्य, शिक्षण, पाणी, ऊर्जा, ग्रामविकास, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या १५ हजार कोटींच्या निधी अनुशेषाची भरपाई करणे अशक्य असल्याचे चटप यांनी स्पष्ट केले.

या आर्थिक असमतोलामुळे विदर्भातील सिंचन क्षमता वाढू शकत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, कुपोषण आणि बालमृत्यू रोखता येत नाहीत. औष्णिक वीज प्रकल्पांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवणे अशक्य झाले आहे. रोजगाराच्या संधींचा अभाव असल्याने तरुण नक्षलवादाकडे वळत आहेत, स्थलांतर वाढले असून लोकसंख्येतील घटमुळे ४ आमदार व १ खासदार अशी लोकप्रतिनिधींची संख्या कमी झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर “स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय” असल्याचा ठाम पुनरुच्चार आंदोलन समितीने केला आहे. ९ ऑगस्टचे नागपूर येथील आंदोलन केंद्र सरकारला निर्णायक इशारा देण्यासाठी असून, हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

पूर्व विदर्भात स्वतंत्र राज्याची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या हेतूने “विदर्भ निर्माण संकल्प मेळावा” रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोंदिया येथील यशोदा सभागृहात दुपारी १२ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विदर्भवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. चटप यांनी केले.
या पत्रकार परिषदेला अॅड. वामनराव चटप यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर (मरकाम), जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, दक्षिण गडचिरोली जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जुम्मन शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.