मुख्यालय सहायकाला ७० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

494

– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ता. ७ ऑगस्ट:- कुरखेडा तालुक्यातील भू‍मि अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) यांना शेतजमिनीच्या मोजणीसाठी तडजोडीअंती ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.
तक्रारदाराने आपल्या शेतजमिनीचा पोटहिस्सा मोजून स्वतंत्र सातबारा करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, आरोपी दिनकोंडावार यांनी त्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने तात्काळ गडचिरोलीच्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली.
५ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी करताना आरोपीने पुन्हा लाचेची मागणी केली. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी तडजोडीनुसार ७० हजार रुपये घेताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. सदर मोहिमेत पोलिस अधीक्षक सागर कवडे (ॲन्टी करप्शन ब्युरो, नागपूर) आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. शासकीय कामासाठी कोणीही अधिकारी किंवा एजंट लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ गडचिरोली ॲन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांनी केले आहे.