गडचिरोलीत शोककळा : मोकाट डुकरामुळे भीषण अपघात, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांचा दुर्दैवी मृत्यू

1571

• शहरातील मोकाट डुकरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- शहरातील कारगिल चौक परिसरात गुरुवारी (दि. २७) रात्री सुमारे ९.४५ ते १० वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात नगरसेवक तथा सभापती मुक्तेश्वर काटवे (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक रस्त्यावर आडवे आलेल्या मोकाट डुकरामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवराव होळी यांच्या स्वागत समारंभानंतर इंदिरा गांधी चौक येथून मुक्तेश्वर काटवे दुचाकीने घरी निघाले होते. कारगिल चौक परिसरात अचानक डुक्कर आडवे आल्याने दुचाकी घसरली. यात काटवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र डोक्याला झालेल्या गंभीर मारामुळे व अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

मोकाट डुकरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शहरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढत असून अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून होत असतानाही नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. आता थेट नगरसेवकाचाच मोकाट डुकरामुळे मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात असून, आता तरी नगर परिषद जागी होणार का, की आणखी अपघातांची वाट पाहणार? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.