गडचिरोली : निमगाव शाळेची दिल्लीच्या NPCI आणि LLF कडून पाहणी
लोकवृत्त न्यूज
धानोरा : एका दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा जेव्हा राज्यात आपल्या गुणवत्तेचा डंका वाजवते, तेव्हा त्याची दखल थेट दिल्लीपर्यंत घेतली जाते. ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानात गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक शाळा, निमगाव या शाळेला भेट देण्यासाठी दिल्लीच्या दोन बड्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी निमगावात दाखल झाले. देशातील डिजिटल क्रांतीचे केंद्र असलेल्या NPCI (National Payments Corporation of India) आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत Learning Links Foundation (LLF) या दिल्लीस्थित संस्थांच्या प्रतिनिधींनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत, रमेश काळबांधे यांना 2023-25 च्या कार्यासाठी ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविले.
शाळेचा कायापालट, डिजिटल शिक्षण पद्धती, परसबाग आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहून दिल्लीहून आलेले पाहुणे थक्क झाले. यावेळी दीपक मित्तल (Head Group – Internal Audit, NPCI, दिल्ली), मनिष दीक्षित (CSR Audit, NPCI), ॲग्नेस नेथन (Trustee, LLF), रूपा भट्टाचार्य (Vice President, LLF), उज्ज्वल गोरे (Manager, LLF) या अधिकाऱ्यांनी शाळेच्या भौतिक सुविधेंची पाहणी केली आणि “ग्रामीण भागातील ही शाळा देशातील कोणत्याही खाजगी शाळेला टक्कर देऊ शकते असे गौरवोद्गार काढले.
या ऐतिहासिक क्षणी शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र लांजेवार व सहकारी शिक्षक रमेश काळबांधे, कोल्हे, कन्नाके, बोरकर मॅडम, नाकाडे मॅडम यांचा गौरव करण्यात आला.
शाळेच्या या यशात ग्रामस्थांचा वाटा मोलाचा ठरला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भजनजी वरखडे, उपाध्यक्ष रोषणी चापडे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर गावडे, चेतन सुरपाम, दिपाली नैताम, महेश मेश्राम, नवनाथ चापडे आणि लोकमित्र बारसागडे यांनी दिल्लीच्या पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात एक सरकारी शाळा जिल्हयात प्रथम येते आणि दिल्लीच्या कंपन्या तिथे येऊन गुंतवणूक व सहकार्य करण्यास उत्सुक होतात, ही बाब राज्य सरकारसाठी अभिमानास्पद आहे. “आमची शाळा आता फक्त जिल्ह्याची नाही, तर राज्याची शान बनली आहे,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.











