नवेगाव ग्रामस्थांचा इशारा : अतिक्रमण, मोकाट जनावरे आणि अवैध धंदे तात्काळ हटवा

369

– अन्यथा घेराव आंदोलन

लोकवृत्त न्यूज
नवेगाव (गडचिरोली) :-  नवेगाव गावातील सार्वजनिक रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण, मोकाट जनावरांचा प्रचंड त्रास आणि जिल्हा परिषद शाळेजवळ उघडपणे सुरू असलेले अवैध व्यवसाय यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला तात्काळ कारवाईचा इशारा दिला आहे.
नुकत्याच अतिक्रमणामुळे झालेल्या अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. मुख्य रस्त्यांवर गाळे उभारणे, बांधकाम साहित्य टाकणे आणि वाहने पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात आहे. त्यातच मोकाट जनावरे रस्त्यावर गर्दी करून अपघाताची शक्यता वाढवत आहेत, तर शेतात घुसून पिकांचेही मोठे नुकसान करत आहेत. जिल्हा परिषद शाळेजवळ काही असामाजिक घटकांकडून निर्भयपणे अवैध व्यवसाय सुरू असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आणि शिक्षणाचे वातावरण बिघडले आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ अतिक्रमण हटवून, अवैध धंदे बंद करून आणि मोकाट जनावरांवर बंदोबस्त न केल्यास ग्रामपंचायतीविरोधात तीव्र स्वरूपाचे घेराव आंदोलन उभारले जाईल आणि त्यासंबंधित सर्व जबाबदारी ही सरपंच आणि ग्रामसेवकावर राहील असे कविता उराडे सहसचिव महिला काँग्रेस कमिटी, उषा गुरनुले, आम्रपाली रामटेके, उत्तरा हजारे, सुनिता गिरडकर, सविता हुड, वर्षा चांदपूरकर, कोमल शेंडे, सपना मांदळे, काजल लाडीलवार, सुनंदाबाई मांदळे, अश्विनी लोणारकर, देवका भावने, अनुसयाबाई शेंडे, मायाबाई कनाके, अनिता कन्नाके, वच्‍छलाबाई शेंडे, सरिता शेंडे, रुखमाबाई शेंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal #ग्रामपंचायत #नवेगाव #अवैध #दारु