रक्षाबंधनाला काळाने हिरावला कारमपल्लीचा पहिला वीज अभियंता

407

रक्षाबंधनाला काळाने हिरावला कारमपल्लीचा पहिला वीज अभियंता

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. ९ :- एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली गावाचा अभिमान असलेला आणि महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत दलसू कटिया नरोटे (वय ३७) यांचा रक्षाबंधनाच्या दिवशी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पत्नी व दोन चिमुकल्या मुलांसह गावी आलेल्या नरोटे यांच्या निधनाने संपूर्ण गाव आणि महावितरण परिवार शोकसागरात बुडाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे कार्यरत असलेले नरोटे सुटीत प्रथम पत्नीच्या माहेरी पुल्लिगुडम (ता. मुलचेरा) येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी ते शेतातील रोवणीचे काम पाहण्यासाठी गेले असता, शेतालगतच्या नाल्याजवळ अचानक त्यांना मिर्गीचा झटका आला आणि ते पाण्यात पडले. बराच वेळ न परतल्याने घरच्यांनी शोध घेतला असता, ते नाल्यात बुडालेल्या अवस्थेत सापडले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
२०१४ मध्ये महावितरणमध्ये अभियंता म्हणून रुजू झालेल्या नरोटे यांनी गडचिरोली, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यांत सेवा बजावली होती. एटापल्ली तालुक्याचा पहिला वीज अभियंता हा मान त्यांच्याच नावावर होता. त्यांच्या जाण्याने दोन चिमुकल्या मुलांचे सावलीसमान वडील कायमचे हिरावले गेले, तर कारमपल्ली गावाने आपला अभिमान गमावला आहे.

 

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal )