– आरोग्य विभागावर थेट आरोप
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेत आरोग्य विभागाच्या फिरत्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 400 मिग्रॅ ब्रुफेनच्या गोळ्या वाटल्यानंतर तब्बल 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना घडली.
सोमवारी 130 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 गोळ्या देत रोज एक खायला सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी जेवणानंतर पहिली गोळी घेताच विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि तापाचा त्रास सुरू झाला. गंभीर अवस्थेतील विद्यार्थ्यांना चामोर्शी व गडचिरोली रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे, 60 विद्यार्थ्यांनी गोळ्या न घेतल्याने त्यांना काहीही त्रास झाला नाही.
ही घटना मंगळवारी घडूनही माहिती बुधवारीच बाहेर आली. युवा सेना अध्यक्ष पवन गेडाम यांनी रुग्णालयातच पत्रकारांना माहिती दिल्यानंतरच प्रकरण उघड झाले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी आरोग्य विभागाच्या पथकाला जबाबदार धरत, औषधवाटप शिक्षकांच्या उपस्थितीत होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
घटनेची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













