लोकवृत्त न्यूज
चामोर्शी :- तालुक्यातील तळोधी (मोकासा) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व पटवून दिले. पावसाळ्यात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी हे मिश्रण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते.
बोर्डो मिश्रण हे कॉपर सल्फेट (मोरचूद) आणि कळीचे चुने (कॅल्शियम हायड्रॉक्साईड) यांच्या मिश्रणापासून तयार होणारे किफायतशीर बुरशीनाशक आहे. द्राक्षांवरील केवडा, बटाट्यावरील करपा, टोमॅटोवरील मर आणि संत्र्यावरील शेंडेमर अशा बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवर हे प्रभावी ठरते. सेंद्रिय शेतीसाठी सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही असल्याने हे मिश्रण कमी खर्चात शेतकऱ्यांना घरच्या घरी तयार करता येते.
याशिवाय, बोर्डो पेस्टच्या स्वरूपात झाडांच्या खोडांना लावल्यास कीटक व रोगांपासून अतिरिक्त संरक्षण मिळते. मात्र हे मिश्रण योग्य प्रमाणात (१:१:१००) तयार करून २४ तासांच्या आत वापरणे आणि प्लास्टिक वा मातीच्या भांड्यात तयार करणे महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना सांगितले.
हा उपक्रम केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रा. प्रलय झाडे, प्रा. छबील दूधबळे, प्रा. पवन बुधबावरे, प्रा. उषा गजभिये, सहाय्यक प्राध्यापक महेंद्र लिल्हारे आणि प्रा. पल्लवी भांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी सायली बुराडे, कशिष चांदेकर, खुशी चंदेल, वैष्णवी चिलके आणि अनुष्का गाडेवार यांनी कार्यक्रम राबविला.










