गडचिरोलीत गुन्हा दाखल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ ऑगस्ट : गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार डॉ. अशोक महादेवराव नेते यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःचे नाव तन्मय मेहता, रा. दिल्ली असे खोटे सांगत बनावट ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) बनावट पत्र तयार करून ते डॉ. नेते यांच्या ई-मेलवर पाठवले. तसेच मोबाईल क्रमांक ७२३६९९४३१८ वरून वारंवार संपर्क साधून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
हा प्रकार २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला. डॉ. नेते यांच्या लेखी तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. 2023 चे कलम 319(2), 336(2), 340(2), 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत हा प्रकार फसवणूक करून खंडणी वसूल करण्याच्या कटाशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपासाची जबाबदारी गडचिरोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
गडचिरोलीत पहिल्यांदाच माजी खासदारांना लक्ष्य करून बनावट पीएमओ पत्राद्वारे खंडणी मागण्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

