पत्नीच्या खुनप्रकरणी पतीस जन्मठेप

453

 गडचिरोली सत्र न्यायालयाचा कठोर निर्णय

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ ऑगस्ट :- “संशयाचे बीज अनेकदा नात्यांचा घात करते,” याचाच प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात आला. पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेतलेल्या पतीने निर्दयपणे तिचा खून केला आणि अखेर न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
जपतलाई (कोवानटोला) येथील परसराम धानुजी कुमरे (वय ४८) हा पत्नी मिराबाई (वय ३७) हिच्या चारीत्र्यावर वारंवार संशय घेत असे. त्यातून ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री भांडणाच्या भरात त्याने लोखंडी मुसळ व चाकूने पत्नीवर वार करून तिचा जागीच खून केला. घटनेनंतर गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आरोपीच्या बहिणी आशाबाई पोटावी यांनी धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
तक्रारीनंतर पोलीस मदत केंद्र, येरकड चे पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीस अटक केली. घटनेतील सर्व पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान फिर्यादी, पंच व साक्षीदारांचे बयान तसेच सरकारी पक्षाचा ठोस युक्तिवाद ग्राह्य धरत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक आर. जोशी यांनी परसराम कुमरेस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास सहा महिने वाढीव कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

#lokvruttnews @LOKVRUTTNEWS @LOKVRUTT. COM #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #न्यायालय #पनीचाखून #जन्मठेप #Court Verdict #MurderCase #CrimeNews #LawAndOrder #Maharashtra #Gadchiroli