कसनसूर येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम निधी अभावी प्रलंबित ;

368

ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्याकडे निवेदन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २९ :- एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे ३३/११ केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले मात्र निधी अभावी त्याचे बांधकाम  रखडलेले असून  त्यामुळे परिसरातील 70-80 गावांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने व नियमित वीज पुरवठा होत नसल्याने कसनसूर परिसरातील ग्रामपंचायत सरपंच ग्रामसभेचे पदाधिकारी यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेतली व निवेदन दिले.
सद्या स्थितीत एटापल्ली उपकेंद्रावरून कसनसूर परिसरातील गावांना वीज पुरवठा होत असून एटापल्ली चे उपकेंद्र ५० किमी अंतरावर असल्याने पावसाळ्यात वारंवार वादळ-वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी नागरिकांना महिनो महिने अंधारात राहावे लागते. शाळा, रुग्णालये व शासकीय कार्यालये यावरदेखील गंभीर परिणाम होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून ऊर्जा खाते सुद्धा त्यांच्याकडे असताना व एटापल्ली तालुक्यातील सुरजागड खदानी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल जिल्ह्यात जमा होत असताना देखील त्याच तालुक्यातील नागरिकांना निधी अभावी दिवसेंदिवस अंधारात राहावे लागत आहे, ही मोठी शोकांतिका असून सदर गावात तातडीने वीज पुरवठा न झाल्यास व कसनसूर येथील 33 /11 केव्ही उपकेंद्राकरिता निधी उपलब्ध करून न दिल्यास परिसरातील ग्रामस्थांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.