गडचिरोलीत घरगुती बाप्पाचा अनोखा देखावा : नक्षलमुक्त गडचिरोली आणि विकासाचा संदेश
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३१ ऑगस्ट : गणेशोत्सव म्हटले की प्रत्येकजण आपापल्या घरातील सजावटीत नवनवीन प्रयोग करतो; पण गडचिरोलीतील अश्विनी सदाशिव देशमुख यांनी साकारलेला देखावा वेगळेपणासाठी विशेष चर्चेत आला आहे. यंदा त्यांनी नक्षलमुक्त आणि विकसित गडचिरोलीचे स्वप्न समाजासमोर मांडले आहे. या देखाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण स्वीकारताना दाखविले असून त्यांच्या शेजारी पोलीस अधीक्षक व सुरक्षा रक्षक उभे आहेत. आत्मसमर्पणाच्या क्षणी मुख्यमंत्री आत्मसमर्पितांना भारतीय संविधानाची प्रत देत स्वागत करताना दाखवले असून यामधून शांतता आणि लोकशाहीचा संदेश देण्यात आला आहे. या सजावटीचे मुख्य आकर्षण म्हणजे वर्दीतला बाप्पा ज्याच्या हातात “हिंसाचार सोडा, विकासाचा मार्ग निवडा” असा संदेश आहे तर बाप्पाच्या पायाशी नक्षलांनी शस्त्र अर्पण करून आत्मसमर्पण केलेले दर्शविण्यात आले आहे.
देखाव्यात गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नांमुळे घडणारा सकारात्मक बदलही प्रभावीपणे दाखविण्यात आला आहे. यात आधुनिक शेती करणारा शेतकरी, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मिळणारी चालना, तब्बल ७५ वर्षांनी दुर्गम भागात दाखल झालेली एस.टी. बस, शाळा व आरोग्य केंद्रांचा विकास तसेच ७९ वर्षांनी दुर्गम गावात पहिल्यांदाच फडकलेला तिरंगा अशा भविष्यातील घडामोडींचे चित्रण करण्यात आले आहे.
गावातील पारंपरिक जीवनाचाही यात समावेश असून एका महिलेने पारंपरिक घरासमोर विकासाची रांगोळी काढताना दाखवले आहे. त्यामुळे संपूर्ण देखाव्याला वास्तवाची जोड मिळाली असून “नक्षलमुक्त गडचिरोली, शांतता आणि विकास” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविला गेला आहे. अश्विनी देशमुख यांच्या या अभिनव प्रयत्नामुळे घरगुती गणेशोत्सवात सामाजिक भान निर्माण झाले असून गडचिरोलीकरांच्या स्वप्नातील उज्ज्वल भविष्याचा कलात्मक आराखडा उभा राहिला आहे.

