गडचिरोलीत जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे लोकशाहीविरोधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नागरी हक्कांवर घाला घालणारे असल्याचा आरोप करत गडचिरोलीत काल इंदिरा गांधी चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.
विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेले मूलभूत हक्क धोक्यात येणार असून, विशेषतः आदिवासीबहुल व संवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात दडपशाही कारवाईची भीती व्यक्त करण्यात आली. कार्यकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिकांवर पोलीस नियंत्रण वाढून ‘पोलिसी राजवट’ निर्माण होण्याचा धोका असल्याने हे विधेयक तातडीने रद्द करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आंदोलनातून करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, भाकप नेते डॉ. महेश कोपूलवार, अ. भा. रिप. पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, भाकप जिल्हा सचिव देवराव चवळे, सीपीएमचे अमोल मारकवार, आजाद समाज पार्टीचे राज बन्सोड, ऍड. कविता मोहरकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, सीपीएम, बहुजन समाज पार्टी, आजाद समाज पार्टी, विविध आदिवासी संघटना यांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करीत हे विधेयक जनतेवर अन्याय करणारे असल्याचा निषेध व्यक्त केला.

