गडचिरोली : कायम नियुक्तीसाठी १७ संवर्ग पेसा कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन
लोकवृत्त न्यूज गडचिरोली , दि. १२ :- जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात कार्यरत १७ संवर्ग पेसा कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी नियुक्तीचा आदेश तातडीने देण्यात यावा, अन्यथा १० सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना ८ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला असून बुधवार १० सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती , काल ११ सप्टेंबर ला पत्रकार परिषदेत आदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली यांनी दिली.
पुढे सांगितले, महसूल व वनविभागाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी काढलेले परिपत्रक तसेच सामान्य प्रशासन विभागाचा ५ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेने केला. या निर्णयानुसार, एक दिवस सेवा खंडीत झाल्यास मागील सेवा ग्राह्य धरली जाणार नाही, यामुळे पेसा क्षेत्रातील १७ संवर्ग कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यात सेवा खंडीत होण्याचा अथवा कर्मचाऱ्यांना शासन कर्मचारी मानले जाणार नाही, असा कोणताही उल्लेख नव्हता, असे संघटनेने निदर्शनास आणून दिले.
“आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादण्यात येत आहे. शासनाने तो निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा १० सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यास आम्ही भाग पडू,” असा ठाम इशारा आदिवासी १७ संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेने निवेदनातून दिला होता.
या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील मडावी, कार्यकर्त्या विशाखा मडावी, राज्य सल्लागार चेतन मडावी यांच्यासह शेकडो कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
#gadchirolinews #Lokvrutt_News @Lokvrutt.com#gadchirolipolice

