गडचिरोली : रखडलेले रस्त्याचे काम व प्रवासी निवारा उभारा

95

– मनसेची राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदनातून मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील रखडलेले रस्त्याचे काम व बसथांब्यावर प्रवासी निवारा उभारण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग (NH-353C) वरील शिवणी व तळोधी मो गावाजवळील नदीलगतच्या रस्त्याचे काम दीर्घकाळ रखडले असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनांचे नुकसान, वाहतुकीतील कोंडी व प्रवाशांचा मनस्ताप हा गंभीर प्रश्न बनला आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच चामोर्शी मार्गावरील बसथांब्यावर प्रवासी निवारा उभारण्यात यावा, जेणेकरून उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात प्रवाशांना होणाऱ्या अडचणींवर तोडगा निघेल, अशी मागणीही करण्यात आली.
संबंधित निवेदनावर सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले
या वेळी इंजि. अंकुश संतोषवार (जिल्हा उपाध्यक्ष, मनविसे गडचिरोली), शुभम कामलापूरवार (शहर अध्यक्ष), आकाश कुळमेथे (जिल्हा सचिव), शुभम देवोजवार, संतोष राजकोंडावार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.