सरकार उद्योगपतींचेच हित जपत आहे ; शेतकरी व सर्वसामान्यांची पिळवणूक – बच्चू कडू

104

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २४ :- “शेतकऱ्यांच्या छोट्याशा कर्जासाठी सरकार तगादा लावते, पण उद्योगपतींची कोट्यवधींची कर्जे सरसकट माफ करते. उद्योगपतींना शेकडो एकर जमिनी उद्योगासाठी दिल्या जातात, तर शेतकरी देशोधडीला लागतो. हे सरकार सर्वसामान्यांपेक्षा उद्योजकांचेच हित जपत आहे,” अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते बच्चू कडू यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केली.

कडू म्हणाले, “पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची आधारभूत किमतीच्या नावाखाली फसवणूक होते. दरवर्षी हेक्टरी १६ हजारांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. मात्र सरकार व्यापारी कंपन्यांना भरघोस मदत करते. उद्योगपतींची तब्बल १७ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली आहेत. यात रिलायन्ससारख्या कंपनीवरचे ४८ हजार कोटींचे कर्जही समाविष्ट आहे. हे उद्योगपती देशातील सर्वसामान्यांची लूट करत आहेत आणि सत्ताधारी त्यांचे खिसे भरत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “जनतेने प्रश्न विचारू नयेत म्हणून धर्म-जातीच्या भांडणात गुंतवून ठेवले जात आहे. आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्याचा कायदा करण्याच्या विधानावरून आदिवासींमध्ये तीव्र रोष आहे. गडचिरोलीत मोठे उद्योग येत आहेत, पण स्थानिकांना किती रोजगार मिळाला याची चौकशी होणे गरजेचे आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी कायद्याचा धाक दाखवला जातो, मात्र खासगी कंपन्यांसाठी त्यालाच बगल दिली जाते. हे सरकार इंग्रजांपेक्षा अधिक जुलमी आहे; इंग्रजच बरे होते.”

बच्चू कडू यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान गडचिरोली ते नागपूर पदयात्रा काढण्याची घोषणा केली. राज्यभर दौरा करून शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन नव्या चळवळीची उभारणी करण्याचाही त्यांचा निर्धार आहे.

जिल्ह्यातील रानटी हत्तींच्या प्रश्नावर त्यांनी सरकार आणि वनविभागावर जोरदार हल्ला चढवला. “हत्ती शेतातील उभे पीक नष्ट करत आहेत. वनविभाग त्यांना थांबवू शकत नसेल तर विभागाची गरज काय? नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकार तुटपुंजी रक्कम देते. ही भरपाई नसून भीक आहे. शेतकऱ्यांना दामदुप्पट मोबदला मिळाला पाहिजे,” अशी मागणी कडू यांनी केली.