– आंदोलनाचा दिला इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ :- गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ४ किमी अंतरावर असलेल्या गोगाव येथे प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरु असल्याने गोगाव मार्गे जाणारी बसफेरी बंद करण्यात आली आहे. परिणामी गोगाव, अडपल्ली, महादवाडी, कु-हाडी, चुरचुरा, नवरगाव आदी गावातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी गडचिरोलीला येण्यासाठी दररोज ४ ते ५ किमी पायदळ प्रवास करावा लागत असून, अनेकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
ऐन पावसाळ्यात सुरु झालेल्या बांधकामामुळे बसफेरी बंद करण्यात आली असून, यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येत्या काही दिवसांत परीक्षा सुरु होणार असताना विद्यार्थी वेळेत पोहोचतील की नाही, याचीही पालकांना चिंता आहे.
पालकांचा संताप फक्त प्रवेशद्वाराच्या बांधकामामुळे बसफेरी बंद करून विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप दिला जात असल्याची भावना पालकांत आहे. अनेक पालकांनी तातडीने अडपल्ली मार्गे पर्यायी बसफेरी सुरु करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनाचा इशारा बसफेरी तातडीने सुरु न केल्यास सर्व गावकऱ्यांसह विद्यार्थी बांधकाम सुरु असलेल्या गोगाव प्रवेशद्वारासमोर चक्काजाम आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.













