लॉयड्स मेटल कंपनीत एक्स्कॅवेटर ऑपरेटरचा मृत्यू

356

बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटनास्थळी प्राथमिक माहिती

लोकवृत्त न्यूज
आष्टी : लॉयड्स मेटल कंपनी, कोनसरी येथे एक्स्कॅवेटर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या शिवकरण यज्ञसेन कुशवाह (वय 40) यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. मृतक आणि फिर्यादी दोघेही कंपनीच्या बॅरेक क्र. C–8 मधील एकाच खोलीत राहत होते.
फिर्यादी कैलास छोटेलालसिंग प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री काम आटोपून बॅरेकमध्ये परतल्यावर शिवकरण दिसून येत नव्हता. यानंतर बॅरेक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला. त्यामध्ये शिवकरण बाथरूम क्रमांक 13 मध्ये पडलेले आढळले. तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथे उपचारार्थ नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, बाथरूममध्ये प्रकृती बिघडल्याने पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेचा मर्ग क्रमांक 009/2025 असा नोंद घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनेची नोंद पोहवा भाडुराव वनकर यांनी केली असून तपास सपोनि मदन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी पोनि विशाल काळे संपूर्ण प्रकरणाची देखरेख करत आहेत.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.