चामोर्शी : राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओची मोटारसायकलला भीषण धडक, दोघे गंभीर
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : तालुक्यातील सोनापूर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C वरील आकाश धाब्याजवळ २५ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर तर एक जण जखमी झाला. फिर्यादी विनायक महादेव मस्के यांना दूरध्वनीद्वारे अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तेथे पाहणी केली असता पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्र. MH 24 EF 7733) रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरात आदळलेल्या अवस्थेत आढळली. धडकेच्या परिणामामुळे वाहनाचा पुढील भाग पूर्णतः चकनाचूर झाला होता. गाडीच्या मागे अंदाजे १५ ते २० फूट अंतरावर हिरो स्प्लेंडर मोटारसायकल तुटलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेली दिसून आली.
प्राथमिक तपासात स्कॉर्पिओ चालक रजनीकांत फुलचंद पावडे (रा. कोनसरी) यांनी वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत मोटारसायकलला जबर धडक दिल्याचे निष्पन्न झाले. धडकेनंतर स्कॉर्पिओ थेट झाडाला जाऊन आदळल्याने वाहनातील प्रवासी, विनोद सदाशिव कोडापे, हा गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला आढळला.
तर मोटारसायकल चालक गुरुदास सत्यनारायण वेलादी (रा. नागपूर) हा गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. जखमी कोडापे याच्यावर ग्रामीण रुग्णालय मोर्शी येथे उपचार सुरू असून वेलादी याला प्रकृती गंभीर असल्याने सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या स्कॉर्पिओ चालक रजनीकांत पावडे याच्याविरुद्ध संबंधित गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.










