गडचिरोलीत मद्यधुंद चालकाचा धिंगाणा, आयटीआय चौकात जबर धडक

1378

– वाहतूक पोलिसाला उडवण्याचा प्रयत्न

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, प्रतिनिधी : शहरातील आयटीआय चौक परिसरात मद्यधुंद चारचाकी वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत दुसऱ्या चारचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याची घटना घडली. आशिष श्रीवास्तव (वाहन क्रमांक एम.एच. ३३ ए.सी. ५१०१) हा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याने हा अपघात झाला. या धडकेत एम.एच. ३३ ए.डी. ४९९१ या वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.
अपघातानंतर संबंधित चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत इंदिरा गांधी चौक परिसरात चालकास अडवले. यावेळी मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसाला वाहनाने उडवण्याचाही प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केल्याची खात्री केली असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात वाढत्या मद्यधुंद वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक असून अशा बेदरकार चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.