कापूस वेचताना वाघाच्या हल्ल्यात महिला शेतमजुर ठार

352

कापूस वेचताना वाघाच्या हल्ल्यात महिला शेतमजुर ठार

लोकवृत्त न्यूज
मूल दि.२८ : चंद्रपूर जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस अधिक वाढत चालला असून मूल तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. सोमनाथजवळील आमटे फार्ममध्ये कापूस वेचण्याचे काम सुरू असताना वाघाने केलेल्या अचानक हल्ल्यात मारोडा येथील महिला शेतमजूर सुनीता शामराव भोयर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संतापाची लाट उसळली आहे.
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुनीता भोयर या इतर मजुरांसह शेतात कापूस वेचत होत्या. सर्वजण कामात मग्न असतानाच शेताच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुनीता यांच्यावर झडप घातली. क्षणार्धात घडलेल्या या थरारक हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. मजुरांनी आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला मात्र तोपर्यंत सुनीता यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुनीता भोयर यांच्या पश्चात वृद्ध आई–वडील आणि मोठा परिवार असून कष्टाच्या मेहनतीवर घर चालवणाऱ्या महिलेचा असा अंत झाल्याने मारोडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाकडे संबंधित वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाच जणांचा बळी गेला असून मानव–वन्यजीव संघर्ष आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे.