चामोर्शीतील नगरसेवक दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
– आरोपी फरार
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी / गडचिरोली दि.२८ :- थकीत कर्ज असलेला ट्रॅक्टर बेकायदेशीररीत्या विक्री करून ७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार चामोर्शी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चामोर्शी पोलिस ठाणे येथे चामोर्शी नगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक दाम्पत्य आशिष अरुण पिपरे व सोनाली आशिष पिपरे तसेच अरुण लहुजी पिपरे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तिघेही आरोपी अद्याप फरार आहेत.
सौ. वंदना रवींद्र कोठारे (वय ३७), रा. प्रभाग क्रमांक ३, गोंड मोहल्ला, चामोर्शी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून मेस्सी कंपनीचा ट्रॅक्टर (MH-33 V-8075) विक्री केल्याचे भासवले. प्रत्यक्षात सदर ट्रॅक्टरवर हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीचे सुमारे ४ लाख ८० हजार रुपये कर्ज थकीत असताना हा व्यवहार करण्यात आला.
तक्रारीनुसार, ट्रॅक्टर मूळतः अरुण लहुजी पिपरे यांच्या नावावर असताना तो सोनाली आशिष पिपरे यांच्या नावाचा असल्याचे भासवण्यात आले. ५०० च्या बाँड पेपरवर ७ लाख ५० हजारांचे आपसी विक्रीपत्र तयार करून ट्रॅक्टर विक्री करण्यात आली. आरटीजीएस प्रणालीद्वारे ही रक्कम सौ. वंदना कोठारे यांच्या पतीच्या खात्यातून नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांनी स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर थकीत कर्जामुळे संबंधित फायनान्स कंपनीने सौ. वंदना कोठारे यांच्या राहत्या घरातून ट्रॅक्टर जप्त केला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौ. कोठारे यांनी आरोपींकडे जाब विचारून रकमेची मागणी केली असता, आशिष अरुण पिपरे व अरुण लहुजी पिपरे यांनी शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणासह चामोर्शी तालुक्यातील विविध अन्यायाच्या तक्रारींबाबत मागील पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्यायग्रस्त महिलांचे ठिय्या व उपोषण सुरू आहे. या उपोषणात सौ. वंदना कोठारे यांचे हे फसवणुकीचे प्रकरणही ठळकपणे मांडण्यात आले असून, दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.
ही घटना १२ डिसेंबर २०२२ ते २० मार्च २०२३ या कालावधीत घडली असून, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २३:३९ वाजता अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३१६(२), ३१८(०४), ३१२, ३५१, ३(५) अन्वये गुन्हा नोंद असून पुढील तपास सुरू आहे.
नगरसेवक दाम्पत्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे.














