नदीत बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

372

• खरकाडा–पिंपळगाव (खळकाळा) परिसरात शोककळा

लोकवृत्त न्यूज
ब्रम्हपुरी : रविवारी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा–पिंपळगाव हद्दीत घडली. मृत तरुणांची नावे शुभम पुष्कराज बगमारे (वय २६) व शुभम विजय सहारे (वय १९) अशी आहेत.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खळकाळा परिसरातील सात ते आठ मित्र रविवारी वैनगंगा नदी काठावर पार्टी करण्यासाठी गेले होते. जेवणाचा बेत नदीपलीकडील कोंढाळा गावच्या बाजूला आखण्यात आला होता. जेवण आटोपून सायंकाळच्या सुमारास परत येत असताना पिंपळगाव–खळकाळा हद्दीतील नदीपात्रात काही मित्रांना आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही.
यावेळी शुभम सहारे, शुभम बगमारे, राज सहारे आणि गौरव वाघधरे असे चौघे नदीत उतरले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या खोल डोहाचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. प्रसंगावधान राखत मित्रांनी राज सहारे व गौरव वाघधरे यांना सुखरूप बाहेर काढले मात्र शुभम बगमारे व शुभम सहारे पाण्यात गटांगळ्या खात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र १ मार्च सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्याला अडथळे आले. परिणामी शोधमोहीम थांबवून २ मार्च रोजी सकाळपासून तहसील प्रशासन, पोलीस यंत्रणा व मच्छिमारांच्या मदतीने पुन्हा शोध सुरू करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंत दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले नव्हते.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नदीकाठावर जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.