कोरची : जमिनीच्या वादातून हत्याकांड, अडीच वर्षांनी पोलिसांनी केला उलगडा
लोकवृत्त न्यूज
ता. प्र /कोरची, दि. ०३ : तालुक्यात तब्बल अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या तरुणाच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात कोरची पोलिसांना अखेर यश आले आहे. जमीन वाटपाच्या जुन्या वादातून हा खून करण्यात आल्याचे सखोल तपासाअंती निष्पन्न झाले असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस ठाणे कोरची येथे भा.न्या.संहिता 2023 मधील कलम 103(1), 238(ब), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रामदास अमरू कळ्यामी (वय 59, रा. आंबेखारी) व दसरू ठाकूरराम कल्लो (वय 42, रा. बोंडे) यांना 02 मार्च 2026 रोजी पहाटे अटक करण्यात आली.
मयत महेश शामसाय कळ्यामी (वय 23, रा. आंबेखारी) हा जुलै 2024 पासून बेपत्ता होता. दीर्घकाळ शोध घेऊनही तो सापडला नसल्याने परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, 27 नोव्हेंबर 2024 रोजी जंगल परिसरात पुरलेला सांगाडा आढळून आला. तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून सदर सांगाडा ताब्यात घेण्यात आला व डीएनए परीक्षणासाठी पाठविण्यात आला.
28 फेब्रुवारी 2026 रोजी प्राप्त झालेल्या डीएनए अहवालात हा सांगाडा महेश कळ्यामी याचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मर्ग चौकशी, साक्षीदारांचे जबाब व तांत्रिक तपास अधिक वेगाने करण्यात आला. तपासादरम्यान जमीन वाटपाच्या वादातून आरोपी रामदास कळ्यामी याने दसरू कल्लो यांच्या मदतीने महेशला जंगल परिसरात नेऊन कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केल्याचे उघड झाले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात पुरण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, एएसआय दलपत मडावी, पोहवा लक्ष्मण नैताम तसेच पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी कौशल्यपूर्णरीत्या केला.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अडीच वर्षांनंतर का होईना, पण सत्य बाहेर आणण्यात कोरची पोलिसांना मिळालेले यश ही तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.#korchi #crimenews














