Home गडचिरोली निमगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भजनजी वरखडे यांचा गौरव

निमगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भजनजी वरखडे यांचा गौरव

227

• मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम

लोकवृत्त न्यूज
​धानोरा : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निमगावने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावून देदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेच्या या गौरवशाली कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भजनजी वरखडे यांचा निमगाव स्थानिक नाटकाच्या प्रयोगादरम्यान जाहीर सत्कार करण्यात आला.
​शासकीय स्तरावर राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत शाळेचा परिसर, शैक्षणिक दर्जा, स्वच्छता आणि लोकसहभाग अशा विविध निकषांवर निमगाव शाळेने जिल्ह्यातून अव्वल स्थान मिळवले. या यशात शाळा व्यवस्थापन समितीचे नियोजन आणि शिक्षकांचे परिश्रम मोलाचे ठरले आहे.
​निमगाव येथे आयोजित नाटकाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भजनजी वरखडे यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
​”हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण गाव, शिक्षक आणि पालकांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना वरखडे यांनी केले.
​शाळेने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण निमगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे शाळेच्या लौकिकात भर पडली असून, इतर शाळांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.

Don`t copy text!