• तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
लोकवृत्त न्यूज गडचिरोली :- मौजा मेंढा येथे घडलेल्या खूनप्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत गडचिरोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या संयुक्त पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास मौजा मेंढा, ता. गडचिरोली येथे अक्षय भानारकर यांच्या राहत्या घरी शामकला सुखदेव किरंगे (रा. हिडदा, ता. कुरखेडा) यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अपक्र. ५७८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान सुदामा चौधरी याने पूर्ववैमनस्यातून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने शामकला किरंगे यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सुदामा रामभाऊ चौधरी (वय ३३, रा. शिरसगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) तसेच चेतन धर्माराव खोब्रागडे (रा. इंदिरानगर, गडचिरोली) यांना अटक केली. याशिवाय एका विधीसंघर्षीत बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून विधीसंघर्षीत बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोउपनि. शिवाजी देशमुख, माधुरी मिसाळ, भावना राऊत तसेच अन्य अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.
गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.














