शेतातील विद्युत कुंपणाचा स्पर्श; युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

43

फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर :- सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथे शेतातील विद्युत कुंपणाच्या तारेला स्पर्श झाल्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. ९ मे रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव रोहित रवींद्र ढोले (वय २८) असे असून, ते आपल्या शेतात उन्हाळी धान पिकाची फवारणी करण्यासाठी गेले होते. सध्या तालुक्यात डबल फसल उन्हाळी धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रानटी प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रोहित यांनी शेताभोवती विद्युत कुंपण केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शेताजवळील डीपीमधील वायर कट झाल्यानंतर विद्युत प्रवाह कुंपणाच्या तारांमध्ये उतरला होता. सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास फवारणी करत असताना रोहित यांचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी त्यांचे वडील व पत्नी देखील शेतात उपस्थित होते. ते गवत कापण्याचे काम करत असताना रोहित मृतावस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह मुल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून वृत्त लिहिपर्यंत अंत्यसंस्कार बाकी होते.
रोहित ढोले यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे पेंढरी परिसरात शोककळा पसरली आहे.