गडचिरोलीत खर्रा विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई ; प्रतिबंधित तंबाखूजन्य साहित्य जप्त

26

•आयटीआय चौकातील पानठेल्यावर छापा ; शहरात खुलेआम सुरू असलेल्या खर्रा विक्रीवर प्रश्नचिन्ह

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील आयटीआय चौक परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या खर्रा विक्रीवर गडचिरोली पोलिसांनी कारवाई करत एका पानठेला चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या कारवाईत खर्रा तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंबाखू व सुपारी मिश्रित साहित्य जप्त करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी शहरात पेट्रोलिंग करीत असताना आयटीआय चौक परिसरातील एका पानठेल्यावर संशयास्पदरीत्या खर्रा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता, पानठेला चालक हा तंबाखू व सुपारी मिश्रित खर्रा साहित्य पांढऱ्या पन्न्यांमध्ये विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून प्रत्येकी ४० रुपये किमतीच्या एकूण १४ खर्रा पुड्या असा सुमारे ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ (प्रतिबंध) अधिनियम २००३ अंतर्गत कलम ६ व शिक्षा कलम २४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरासह ग्रामीण भागातही प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांपासून तयार होणाऱ्या खर्रा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खुलेआम खर्रा तयार करून विक्री केली जात असून युवकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्याचे व्यसन वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
पोलिसांची ही कारवाई स्वागतार्ह मानली जात असली तरी केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उपयोग नसून, खर्रा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पुरवठा करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.