गडचिरोलीत अपघातांची मालिका कायम ; कारगिल चौकात बुलेट–स्कुटीची जोरदार धडक, एक जखमी

357

गडचिरोलीत अपघातांची मालिका कायम ; कारगिल चौकात बुलेट–स्कुटीची जोरदार धडक, एक जखमी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 22 डिसेंबर : गडचिरोली शहरात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शहरातील कारगिल चौक येथे बुलेट आणि स्कुटी यांच्यात जोरदार अपघात झाला.
चंद्रपूर रोडने येणारी बुलेट (क्रमांक CG 08 X 4892) चालक स्वप्नील टेंभुर्ण (रा. कुरखेडा) आणि स्कुटी (क्रमांक MH 33 U 7981) चालक सतीश रामदास बुलबुले (वय ४८, रा. गडचिरोली) यांच्यात हा अपघात घडला. धडकेमुळे स्कुटीस्वार सतीश बुलबुले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या अपघातामुळे काही काळ कारगिल चौक परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शहरातील वर्दळीच्या चौकात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, वाहतूक शिस्त आणि सुरक्षेच्या उपाययोजना कडक करण्याची मागणी होत आहे.