“जागो ग्राहक जागो”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ : राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाच्या निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने ग्राहक जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत वसंत विद्यालय, गडचिरोली येथील शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागरूकता निर्माण केली.
“जागो ग्राहक जागो”, “ग्राहक हक्क आमचा अधिकार”, “फसवणुकीला नाही, जागरूकतेला होकार” अशा प्रभावी घोषणांनी रॅलीदरम्यान परिसर दुमदुमून गेला. हातात फलक व बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी ग्राहकांचे हक्क, योग्य बिल घेण्याचे महत्त्व, वजन-मापातील अचूकता, भ्रामक जाहिरातींपासून सावधगिरी तसेच ऑनलाईन व्यवहारात दक्षता बाळगण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
या जनजागृती रॅलीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली जिल्हाध्यक्ष उदय धकाते, विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पतरंगे, उपाध्यक्ष विजय साळवे, सदस्य एम. डी. मेश्राम, सतीश धाईत, महिला सदस्य मीरा बिसेन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता कामडी व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष विजय साळवे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना, कार्यपद्धती व ग्राहक संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांनी, ग्राहकांनी सजग राहणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद करून ग्राहक हक्कांचे संरक्षण, जनजागृती आणि न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कशा प्रकारे कार्य करते याबाबत माहिती दिली.
विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पतरंगे यांनी, “विद्यार्थीदशेतच ग्राहक जागरूकतेचे संस्कार झाले, तर भविष्यात समाज अधिक सक्षम आणि सजग बनेल,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापिका सौ. सुचिता कामडी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्याचे कौतुक केले.
राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रचार-प्रसार व जनजागृती अभियानामुळे समाजात ग्राहक हक्कांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.










