संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. : श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त श्री संताजी भवन, गडचिरोली येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जाणिवेचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.
या रक्तदान शिबिराचे आयोजन तेली समाजाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. शिबिरात रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून गरजू रुग्णांसाठी मोलाची मदत केली. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. गडचिरोली रक्तकेंद्राच्या वतीने आयोजकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आभार मानण्यात आले. तेली समाजाने दाखवलेल्या सामाजिक जाणिवेबद्दल उपस्थित बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी पुढील काळातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे, असा सूर उपस्थितांमध्ये दिसून आला. रक्तदानासारख्या पवित्र उपक्रमातून संताजी जगनाडे महाराजांच्या विचारांचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला, अशी भावना व्यक्त करण्यात आली.










