पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून : मृतदेह नदीपुलाजवळ टाकून अपघाताचा बनाव

901

– पत्नी व प्रियकर अटकेत

लोकवृत्त न्यूज
कुरखेडा, प्रतिनिधी : शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवार, ३१ डिसेंबर रोजी समोर आली असून या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक दिनेश सूर्यभान डोंगरावर (वय ३३, रा. गेवर्धा) व पत्नी रेखा दिनेश डोंगरावर (वय २८) यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, रेखा हिचे विश्वा सांगोळे (वय २५, रा. भरनुली) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
३० डिसेंबर रोजी रात्री दिनेश व रेखा यांच्यात घरीच जोरदार भांडण झाले. याच वेळी पत्नी रेखा हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने पती दिनेश याची हत्या केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दुचाकीवरून सती नदी पुलाजवळ नेऊन फेकून दिला व बाजूलाच दुचाकी पाडून अपघात झाल्याचा बनाव रचला.
मात्र, मृतदेह नदीपर्यंत नेत असताना ठिकठिकाणी पडलेले रक्ताचे डाग व घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल तपासानंतर हे अपघात नसून हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे जाऊन आरोपी पत्नी रेखा व तिचा प्रियकर विश्वा यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या थरारक हत्याकांडामुळे कुरखेडा शहरात भीतीचे व चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.