नवीन वर्षाच्या स्वागताआधीच काळाचा घाव ; नागभीडमध्ये दुर्दैवी अपघातात दोघे ठार

142

नवीन वर्षाच्या स्वागताआधीच काळाचा घाव ; नागभीडमध्ये दुर्दैवी अपघातात दोघे ठार

लोकवृत्त न्यूज
नागभीड, दि.31 डिसेंबर :- नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मंगळवारी रात्री एक भीषण रस्ते अपघात घडून दोन तरुणांचे प्राण गेले. तळोधी येथील गायमुख रोडवरील सावंगी फाट्यासमोर झालेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातात वैभव गुरनुले (वय २७, रा. जवराबोडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले राकेश माणिक गुरनुले (वय ३५, रा. ओवाडा, ता. नागभीड) यांना तातडीने नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, दोघेही जवराबोडी येथून तळोधीकडे दुचाकीवरून जात असताना सावंगी फाट्याजवळ अपघात झाला. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल घुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

नववर्षाच्या उंबरठ्यावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रस्त्यावरील सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.